नागपूर : १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमा येथे ब्रिटिश आणि पेशवे यांच्यात युद्ध झाले व या युद्धात जुलमी, अन्यायी पेशवाईचा अंत झाला. या युद्धाचे स्मरण म्हणून कोरेगाव भीमा येथे जयस्तंभ बांधण्यात आला व तिथे रखवालदार म्हणून माळवदकर यांना ठेवण्यात आले होते. याच माळवदकर कुटुंबाने ऐतिहासिक जयस्तंभ आणि जयस्तंभ परिसरातील जागेवर अतिक्रमण केले असून त्या अतिक्रमणाच्या विरोधात भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून मी न्यायालयीन लढाई लढत असलो तरी ही आपल्या समाजाची अस्मितेची लढाई आहे म्हणून समाजातील प्रत्येक व्यक्तीने ही अस्मितेची लढाई स्वतः पुढे येऊन लढली पाहिजे. या न्यायालयीन लढाईची माहिती आंबेडकरी अनुयायाने घराघरात जनजागृती अभियान मार्फत पोहचवण्यास सहकार्य केले तर आगामी नायायलयीन लढाई आपल्या सर्वांसाठी सोपी जाईल म्हणून ज्याला या विषयावर माहिती मिळेल त्याने ती माहिती सोशल मीडिया तसेच इतर माध्यमातून इतरांना पोहचवलीच पाहिजे व ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे व ती आपण पार पाडावी असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी नागपूरमधील भीमा कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण संविधानात्मक न्यायालय लढा जनजागृती अभियान कार्यक्रमात उपस्थित धम्म उपासक आणि उपासिका यांना केले. माळवदकर कुटुंबातील एका सदस्यांनी काही दिवसांपूर्वी जयस्तंभ आमची खाजगी मालमत्ता आहे अशा प्रकारचे विधान केले होते तर भीमा कोरेगांव येथे लढाई झाली नाही तर चकमक झाली असे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे पुस्तक लिहिले होते. माळवदकर कुटुंबाच्या या कृत्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. कोरेगाव भीमा येथे लढाई झाली की नाही? जयस्तंभ नेमका कुणाचा? व १ जानेवारीला जयस्तंभ परिसरात प्रवेश करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी का घ्यावी लागते? हा न्यायालयीन खटला काय आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायांमध्ये मोठी उत्सुकता असून मागील काही दिवसांपासून याच विषयावर छत्रपती संभाजी महाराज नगर (औरंगाबाद) व मुंबई मध्ये जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले होते व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता कॉन्फरन्स हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, उरुवेला कॉलनी, वर्धा रोड, नागपूर येथे ‘भीमा कोरेगाव जयस्तंभ इतिहास आणि वर्तमानाची वास्तविकता’ या विषयावर भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांचे व्याख्यान झाले त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ते पेशवाई आणि पेशवाई ते भीमा कोरेगाव येथील लढाई हा सर्व इतिहास सांगून कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ व जयस्तंभ परिसरात जे अतिक्रमण झाले आहे व त्या विरोधातील न्यायालयीन लढाई या विषयावर सविस्तर कागदोपत्री माहिती दिली. या लढ्यात आपण सर्वांनी साथ द्यावी अशी विनंती केल्यावर सर्व उपस्थितांनी या लढाईत आम्ही सोबत आहोत असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष समता सैनिक दलाचे मार्शल सुनील सरिपुत्त होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक धम्मपाल आवळे यांनी केले त्यांनी ही जनजागृती का आवश्यक आहे याची सविस्तर माहिती दिली. उपासिका सुगंधाताई खांडेकर यांनी पाहुण्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्शल सुनील सारीपुत्त यांनी भीमा कोरेगांव अतिक्रमणाच्या विषयी माहिती देऊन आम्ही या न्यायालयीन लढ्यात सर्व नागपूरकर सोबत आहोत असे अध्यक्षीय भाषणात सांगितले. सुरुवातीला समता सैनिक दलाच्या सैनिकांनी पाहुण्यांचे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संचालन करून स्वागत केले व संपूर्ण कार्यक्रमाची सुरक्षतेची चोख व्यवस्था राखली.
कार्यक्रमाची त्रिसरण व पंचशील घेवून सुरुवात झाली. समता सैनिक दलाचे सैनिक यांनी दिलेली मानवंदना व कार्यक्रमाचे संयोजन याचे उपस्थितांनी कौतुक करून आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने समता सैनिक दल, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नागपूर ग्रामीण, राष्ट्रीय बौद्ध महासभा, बानाई शाखा नागपूर, ब्लू क्लब नागपूर, मानव अधिकार संरक्षण मंच, फ्रेंड्स मानव कल्याण संस्था यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते धम्मपाल आवळे, विशाल मानकर, आशिष फुलझेले, डॉ. आर.एस. वाणे, ईस्वर कडबे,अविनाश कठाणे, व्यंकटराव चौधरी, प्रवीण गजभिये, पृथ्वी मोटघरे, नागेश बडगे, सुगंधाताई खांडेकर, हेमराज दहाट व आदी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. हा ऐतिहासिक न्यायलायीन लढा समजून घेण्यासाठी नागपूर परिसरातील सर्व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दाखवून या अभियानात सहभागी झाल्याबद्दल भीमा कोरेगाव जयस्तंभ जनजागृती अभियान कृती समिती नागपूर यांनी सर्वांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल मानकर यांनी केले तर आभार आशिष फुलझेले यांनी मानले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.