वाडा: डोंबिवलीचे ख्यातनाम उद्योजक तसेच प्रसिद्ध खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉ.सुनील खर्डीकर यांच्या मातोश्री स्वर्गीय चंद्रभागा गणपत खर्डीकर यांच्या स्मरणार्थ गावखेड्यातील गरजू व होतकरू शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खर्डीकर प्रसारक मंडळाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील वाडा व मोखाडा येथे हा उपक्रम राबविण्यात आला होता. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशभरात ध्वजारोहणसह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. असाच उपक्रम खर्डीकर प्रसारक मंडळाच्या माध्यमातून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात आला . या उपक्रमाचा असंख्य विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या विद्यार्थ्यांना वह्या, दप्तरं, पेन, पेन्सिल, बॉक्स अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप मोफतरित्या केले गेले. यावेळी खर्डीकर प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ. सुनील खर्डीकर,सेक्रेटरी संगीता सुनील खर्डीकर,खजिनदार संकेत खर्डीकर, ज्येष्ठ पत्रकार दादाभाऊ अभंग, आदिवासी सेवा मंडळ या संस्थेच्या संचालिका शोभना जाधव, संस्थेच्या वाडा येथील आश्रम शाळेच्या अधिक्षिका उज्वला दिनेश पाटील तसेच मोखाडा येथील संस्थेच्या अधीक्षिका सुनीता कामडी उपस्थित हे मान्यवर होते.
देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र देशातील काही भागात अजूनही आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण झालेले नाही. शैक्षणिक क्षेत्रात मागील ३० वर्षांपासून मी कार्यरत असून आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही हा उपक्रम राबविला असल्याचे डॉ.सुनील खर्डीकर यांनी सांगितले. विद्यार्थी दशेत असताना माझ्या मुलाने खूप शिकावे आणि मोठं व्हावे अशी आमच्या मातोश्री चंद्रभागा खर्डीकर यांची खूप तळमळ होती. गावखेड्यातल्या शाळेत मी देखील शिक्षण घेतले आहे. त्यामुळे वह्या, पुस्तकांसाठी कशा समस्यांना तोंड द्यावे लागते हे मी अनुभवले आहे. मी माझ्या आईच्या आशिर्वादाने स्वतःही शिकलो आणि आता इतरांनाही शिकवत आहे. त्यामुळेच आज माझ्या आईच्या समरणार्थ आम्ही हा उपक्रम राबवून या ग्रामीण भागात येऊन मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले आशा भावना यावेळी डॉ. सुनील खर्डीकर यांनी व्यक्त केल्या.