अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून युवा उद्योजक सुमेध भवार महाविकास आघाडीकडून (काँग्रेस) इच्छुक….

Share

अंबरनाथ: आगामी विधानसभा निवडणुकीत यावेळी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात बिग फाईट बघायला मिळणार आहे. महायुतीतर्फे तीन वेळा निवडून आलेले आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते तर महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार निवडणुक लढवणार यावर अजूनही निश्चित झालेले नाही. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर हे मागील पंधरा वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. मागील अडीच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा ही प्रभाव या मतदारसंघात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांची महाविकास आघाडी आहे तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपा यांची महायुती आहे. महाविकास आघाडी, महायुती, वंचित बहुजन आघाडी तसेच इतरही राजकीय पक्षाचे उमेदवार या मतदार संघातून निवडणूक लढवणार असून अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात नेहमीच उमेदवारांची संख्या लक्षणीय असते. महायुतीचे उमेदवार आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याने महाविकास आघाडीचा उमेदवार कोण अशा प्रकारची मतदारसंघात चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला ती जागा असे सूत्र आहे पण काही मतदारसंघात फेरफार, अदलाबदल करून ज्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल त्या पक्षाला ती जागा देण्यात येईल असे ही जाहीर करण्यात आले आहे. महाविकास आघाडीने अजून आपला कुठलाही उमेदवार जाहीर केलेला नाही. महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षातर्फे युवा उद्योजक व सुमेध भवाऱ युथ फाऊंडेशनचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचा सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्याचा वारसा लाभलेले युवा उद्योजक सुमेध भवार यांनी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मागितली आहे तशा त्यांनी दिल्लीतील व राज्यातील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी गाठीभेटी घेतल्या आहेत. सुमेध भवार यांचे वडील हिरामण भवार (आबा) हे मुंबईतील आयआयटी पवई येथील कंपनीमध्ये काम करत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुमेध भवार यांनी उच्च शिक्षण घेऊन त्यांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केला. आज त्यांचा व्यवसाय वेगवेगळ्या देशात सुरू आहे. वडील हिरामण भवार (आबा) यांचे सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अंबरनाथ मध्ये मोठ्या प्रमाणात काम असून तोच वारसा सुमेध भवार यांनी पुढे चालू ठेवला आहे. व्यवसाय करीत असताना सामाजिक भावनेतून आपल्या विभागातील तरुणांना, तरुणींना व इतर बेरोजगारांना रोजगार मिळावा, शिक्षण मिळावं व त्यांच्या समस्या व प्रश्न सोडवण्यात यावे म्हणून त्यांनी सुमेध भवार युथ फाऊंडेशनची स्थापना केली. आज या संस्थेतर्फे त्यांनी अनेक रोजगार मेळावे, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्रीडा असे विविध उपक्रम राबवले आहेत. म्हणून अशा एका युवा उद्योजकाला सुशिक्षित व तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या युवा कार्यकर्त्याला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी अशी अंबरनाथ मधून जनतेची मागणी होत आहे.आमदार डॉ. बालाजी किणीकर हे मागील पंधरा वर्षापासून आमदार असून त्यांनी पंधरा वर्षात विकासाची केलेली कामे, त्यांचा मतदारसंघातील मतदारांशी सततचा जनसंपर्क यामुळे त्यांची मतदारसंघात मोठी पकड आहे तर युवा उद्योजक सुमेध भवार यांना जर महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर युवा उद्योजक सुमेध भवार यांचा तरुणांमध्ये असलेला दांडगा जनसंपर्क, सर्व जाती, धर्माच्या लोकांमध्ये असलेले सलोख्याचे संबंध व लोकांकडून त्यांना मिळत असलेला प्रतिसाद यामुळे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात एक चांगली बिग फाईट अंबरनाथकरांना बघायला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *